न्यायलयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नाही… हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया

हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया काय?

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आज त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला.

पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार ? असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, मात्र मी पक्षाविरुद्ध कोणंतही वक्तव्य केलेलं नाही असं बडगुजर यांनी स्पष्ट केलं. असं कोणंतही वक्तव्य मी केलं असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावं असं आव्हानही त्यांनी दिलं. पण संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली, काल उघडपणे बोलून दाखवलं, तो जर गुन्हा असेल तर तो मी केलाय असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे, असंही बडगुजर म्हणाले.

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहात का, संवाद साधणार का असा सवाल बडगुजर यांना विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. हकालपट्टीनंतर कोणता संवाद साधणार ? न्यायलयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नसतो, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला जातो असं म्हणत त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

ही बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)