पुणे : काँग्रेस संघटनेचे तळागाळापर्यंत काम आहे. विधानसभा व महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कामास लागावे अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या.
प्रदेशाध्यक्ष पटोले हे कामगार संघटनेच्या आक्रोश मेळाव्यास आले असता त्यांनी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन शहर काँग्रेसच्या विविध उपक्रमाची व कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग रचना, तिन्ही विधानसभा निहाय बूथ कमिटी बनविणे बाबतची माहिती व शहरातील प्रमुख नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचा संघटनात्मक कामाचा आढावा घेतला, तसेच शहर काँग्रेस कमिटीतर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘काँग्रेस पक्ष करदात्या नागरिकांच्या दारी’ डिजिटल प्रचार वाहनांचा शुभारंभ करण्यात आला. शहर काँग्रेसने गेले तीन वर्ष राबविलेली उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने तसेच संघटनेचे काम बघता, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष काम करीत असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच होऊ घातलेल्या विधानसभा व महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कामास लागावे अशी सूचना केली.