ST Bus: नव्या ‘लालपरी’साठी दिवाळीचा मुहूर्त; २४०० साध्या एसटीखरेदीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : नव्या लालपरीतून अर्थात, साध्या एसटीगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे २४०० तयार गाड्या एसटी ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील तीनशे गाड्यांचा पहिला टप्पा दिवाळीत प्रवासीसेवेत दाखल होणार आहे.

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यांत गाड्यांची कमतरता आहे. सध्या धावत्या असलेल्या गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये सातत्याने वाढ होते. यामुळे साध्या २२०० अधिक दोनशे अशा एकूण २४०० गाड्या खरेदीचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता. प्रस्ताव मंजूर करून २०२३-२०२४च्या अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.

लोकसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत तब्बल वर्षभर तयार गाड्या खरेदीचा प्रस्ताव रखडला होता. तयार गाड्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता त्यावर एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाली आहे. येत्या काही दिवसांत अशोक लेलँड कंपनीला कार्यादेश देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रारूप बसची एसटी महामंडळाच्या पथकांकडून चाचपणी करण्यात येणार आहे. त्यानंतर तीनशे गाड्या प्रवासीसेवेत दाखल होणार आहेत. संपूर्ण २४०० गाड्या मार्च २०२५पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होईल, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तयार गाड्यांची खरेदी

गाड्यांच्या चेसिस खरेदी करून बॉडी बांधणी महामंडळाच्या दापोडी आणि अन्य कार्यशाळेत करण्यात येत होत्या. ही वेळखाऊ प्रक्रिया वाचवण्यासाठी तयार गाड्या खरेदी करण्यात येत आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनावेळी ‘मिशन रफ्तार’; मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ताशी १६० किमी वेगाने धावणार
१५,८००
सध्या एसटीच्या ताफ्यातील बस

८००
गाड्यांचे मालवाहनांमध्ये रूपांतर

१४,५०० ते १४,७००
रोज सरासरी बसमधून प्रवासी वाहतूक

मागणी सतत वाढतीच

शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतुकीसाठी पुन्हा एकदा शालेय फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी बस गाड्यांची मागणी सातत्याने वाढती आहे. अशातच नव्या एसटी गाड्या दाखल होण्यासाठी किमान तीन महिने वाट पाहावी लागणार असल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे.