पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा असं आठवले यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत, याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी लोणावळ्यात पहेलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले.
लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आठवले लोणावळ्यात आले होते. यावेळी लोणावळा शहरातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भाग भारतात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने देखील तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, आमचं सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळा येथे व्यक्त केले आहे.
पाकिस्तानची कोंडी
दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं चारही बाजुनं पाकिस्तानची कोंडी केली आहे. जगातील अनेक मोठ्या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला आहे. भारताकडून सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून आता युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे.