जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते.
नेमकं काय म्हटलं फडणवीस यांनी?
आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. ऐतिहासिक याकरता की स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल गावाला दंड झाला, तो दंड न्यायालयात माफ करण्यात आला. आता त्या दंडाच्या पैशातून काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना, मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गरुड साहेबांनी या संस्थेची स्थापना केली, असं फडणवीस यांनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितल्या पाहिजे. आम्ही तेवढे डीपी तुम्हाला देऊ. दुसरं तुम्ही सांगितलं की येथील काही शेतकऱ्यांनी सोलरसाठी पैसे भरले आहेत. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्याला कनेक्शन मिळेल. आमच्याकडे कनेक्शनची कुठलीही कमतरता नाही. 365 दिवस दिवसाचे बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत, त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून आता विजेचे पैसे घेत नाहीत, पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत. शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमचा या सरकारचा हेतू आहे. त्यामुळे त्यांना मोफत वीज देण्यात येत आहे. असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गिरीश महाजन यांच्या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला जर मी उशिरा गेलो तर गिरीश महाजन मला इथेच चित करतील असं मिश्किल विधान देखील यावेळी फडणवीस यांनी केलं.