वसंत ऋतुच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. केवळ निसर्गाशी संबंधित सण मानला जात नाही तर या दिवसाचे धार्मिक महत्त्वही आहे. या दिवशी विशेषतः लोक देवी सरस्वतीची पूजा करतात आणि तिला केसर भाताचा नैवेद्य दाखवतात. केसर भात अत्यंत चविष्ट लागतो. तुम्ही वसंत पंचमीला केशर भात बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवून सोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना हा पदार्थ खाऊ घालू शकता. केशर भात तयार करणे अगदी सोपे आहे. वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजनाव्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी ही तुम्ही हा भात तयार करू शकता. या वेळेला तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. तर यानिमित्ताने जाणून घेऊ केशर भात तयार करण्याची रेसिपी.
केशर भात तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
केशर भात करायचा असेल तर बासमती तांदूळ घ्या कारण बासमती तांदुळाचा भात मोकळा होतो. जर तुम्ही एक कप बासमती तांदूळ घेत असाल तर दोन कप पाणी घ्या. यासोबतच अर्धी वाटी साखर, दोन मोठे चमचे गावरान तूप, दहा ते बारा काजू, दहा ते बारा मनुके, सहा सात बदाम, अर्धा चमचा हिरवी वेलची पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, सुके खोबरे, 60 ग्रॅम, 1 चमचा दूध आणि पाच ते सहा केशराच्या काड्या.
केशर भात बनवण्याची कृती
सर्वप्रथम बासमती तांदूळ नीट धुवा आणि नंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
गॅसवर एक जाड तळाचा पॅन गरम करून त्यात गावरान तूप घालून त्यात काजू, बदाम मनुके, आणि चिरलेले खोबरे सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या.
एका ताटामध्ये सर्व परतलेले काजू, बदाम आणि खोबरे काढून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेले तांदूळ, पाणी, साखर, वेलची पूड आणि दालचिनी पूड टाकून दोन शिट्ट्या करा.
तांदूळ शिजेपर्यंत एक चमचा दुधात केसरच्या काड्या टाकून भिजवा. केशर दुधात भिजवताना दूध गरम करून घ्या.
कुकरच्या दोन शिट्या झाल्यानंतर त्यामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि केशर दूध टाकून दोन ते तीन मिनिटे पुन्हा गॅसवर ठेवा.
तयार केशर भात एका ताटात किंवा भांड्यात काढा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका आणि देवाला नैवेद्य दाखवा.