भाजप आमदाराच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, सतीश वाघ मृतावस्थेत आढळले
पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडले आहेत. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपी कोण होते? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण का केलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
विशेष म्हणजे एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचं अशाप्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न समोर येत होता. या प्रकरणी पोलिसांकडून सतीश वाघ आणि आरोपींचा शोध सुरु होता. अखेर एक वाईट बातमी समोर आली आहे. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यात एका ठिकाणी मृतावस्थेत सापडले आहेत. त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांचा यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.