आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. त्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करण्यात आली. शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन हे सर्व नेतेमंडळी जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले होते. सर्वे नेतेमंडळी क्रेनला असलेल्या ट्रॉलीच्या सहाय्याने वर चढले होते. हार घालून खाली येताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचा तोल गेला. त्यात जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख सुखरूप असून अमोल कोल्हे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती. ट्रॉलीचा नट निसटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने देखील जनसंवाद यात्रा सुरू केली असून कुणाच्या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.