जय शिवाजी,जय भवानीच्या जयघोषात राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी

Shiv Jayanti celebrated with great enthusiasm in the state with the chants of Jai Shivaji, Jai Bhavani

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आज राज्यासह जगभरात साजरी करण्यात आली. शिवरायाचे जन्मस्थान असलेल्या पुण्याजवळील जुन्नरच्या किल्ले शिवनेरीवर पाळणा हलवून शिवबाची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशजासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात विविध सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला.

मुरबाडकरांचा शिवरायांना रॅलीद्वारे मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरात “शिवज्योत ” बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुरबाड तालुक्यातील शेकडो तरूण सहभागी झाले होते. मुरबाड तालुक्यातील ठाणेकर तरूणांनी तीन वर्षांपूर्वी राजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीला हा उपक्रम सुरू केला आहे. अनिल भांगले यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठानने ही रॅली काढली. वर्तक नगर नाक्यापासून ज्ञानेश्वर नगरमार्गे आग्रा रोडमार्गे तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. शिवनेरी किल्ल्यावरून प्रज्वलित केलेली ‘शिवज्योत’ या रॅलीतील खास आकर्षणाचा भाग होती. या रॅलीतून शिवकार्याचा गौरव करणे हा एकमेव उद्देश असून या माध्यमातून मुरबाडकरांना संघटीत करून सामाजिक कार्याची मूहर्तमेढ रोवण्यात येणार आहे,असे अनिल भांगले यांनी सांगितले. नितीन गावठ, जनार्दन पवार, जगदीश शेलवले, हरीश चौधरी, सुनील पवार , जयेश खापरे यांचा आयोजनात सक्रीय सहभाग होता.

जळगावात भव्य पदयात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य “जय शिवराय, जय भारत” पदयात्रेचे आयोजन केले होते, आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी आदिवासी नृत्य केले.पदयात्रेत आकर्षक सजविलेल्या रथावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान केलेले बालकलाकार होते. युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शस्त्रकलेचे प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजि केलेल्या या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

रायरेश्वर किल्ल्यावर 40 फुट उंच ध्वज

पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर 40 फुट उंच ध्वज स्तंभाचं आज बुधवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ध्वज स्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकावण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ल्याचा सारा परिसर दुमदुमला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरील शिव मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती.असे असूनही अद्याप या किल्ल्याचा हवा तेवढा विकास झालेला नाही.यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन मांडेकर यांनी शिवप्रेमींना दिले आहे.

धाराशिवमध्ये जिजाऊ स्मारकाचे अनावरण

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळंबमध्ये जिजाऊ स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्या संकल्पनेतून जिजाऊ चौक आणि स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्मारकाचे अनावरण करण्यात आलं. कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात शिवप्रेमींचा सहभाग घेतला होता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)