Shivaji Park: शिवाजी पार्क महागणार! २५० रुपयांचा दर BMCला परवडेना, शुल्कवाढीचा  विचार

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान हे राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठी ओळखले जाते. खासकरून शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या जाहीर सभांसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे येत असतात. मात्र या मैदानात सभा, तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून मागील अनेक वर्षे अवघे २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. आता त्यात वाढ करण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जी उत्तर विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून क्रिकेटचा सराव आणि सामने होत असतात. फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येत असतात. हे मैदान नेहमीच राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या सभांचे, घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह मनसेचा गुढीपाडवा मेळावा येथे होतो. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढही असते. सभेसाठी मोठ्या आकाराचे व्यासपीठ उभारण्यासाठी मैदान खणले जाते. तसेच झेंडे, मोठी स्क्रीन बसवण्यासाठी बांबू बसवण्यात येतात. कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय केली जाते. सभा संपल्यानंतर व्यासपीठासह सर्व साहित्य आयोजकांकडून परत नेण्यात येते. मात्र अनेकदा अशा सभांमुळे मैदानाची दुरवस्था होते. या मैदानावर राजकीय पक्ष किंवा आयोजकांकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. हीच परिस्थिती धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनंतरही उद्भवते.

सध्या राजकीय सभा, तसेच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्क मैदानातील जागा देताना मुंबई महापालिका अवघे २५० रुपये अधिक जीएसटी एवढे शुल्क आकारते, तर २० हजार रुपये अनामत रक्कम घेते. शुल्क आणि अनामत रक्कम अत्यंत अल्प असल्याने, ती वाढण्याचा विचार महापालिकेकडून केला जात आहे. एक लाख रुपये किंवा अधिक अनामत रक्कम आणि २० ते ३० हजार रुपये शुल्क आकारण्याचा महापालिकेचा विचार आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे लोकसभा निवडणुकीनंतर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

सभा किंवा कार्यक्रमांनंतर मैदानाची दुरवस्था होती. त्याच्या दुरुस्तीखर्चाची वसुली आयोजकांनी ठेवलेल्या अनामत रकमेतून केली जाते. मात्र ती अत्यल्पच असते. मागील अनेक वर्षे या शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पंधरा तारखेला जिल्ह्यात ‘प्रचारवॉर’; मोदी, पवार, ठाकरेंच्या पिंपळगाव-दिंडोरी-नाशिकला सभा
धोरणाचा विचार

राजकीय सभा, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे शिवाजी पार्क मैदानाची होणारी दुरवस्था टाळण्यासाठी शुल्क आणि अनामत रकमेमध्ये वाढ करण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. या कार्यक्रमांसाठी मैदानात खोदकाम केल्यानंतर, ते बुजवणे, मैदानाची साफसफाई यांसाठी अनामक रकमेमधून सध्या कापण्यात येणारी रक्कम अत्यल्प आहे. त्यातही वाढ करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

धुळीवर तोडगा नाहीच

शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या समस्येवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यश आलेले नाही. पार्कमधील माती वाऱ्यामुळे उडत असून, त्याचा शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. सध्या धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील हवेत उडणारी माती व्हॅक्युम तंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये जमा केली जात आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयआयटी, मुंबईकडून उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. यासाठी आयआयटीतील तज्ज्ञांनी एप्रिल अखेरीस मैदानाची पाहणी केली होती. लवकरच त्याचा अहवाल मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाला सादर केला जाणार आहे.