शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाजपच्या कार्यालयात, चर्चा तर होणारच?

खासदार वाझे यांचा सत्कार करताना आमदार देवयांनी फरांदेImage Credit source: TV 9 Marathi

Maharashtra Politics News: शिवसेना उबाठाला सध्या गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उबाठाचा गड असलेल्या कोकणात मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. पक्षातील ही गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोकण दौराही केला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाजप कार्यालयात गेले. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

राजाभाऊ वाझे भाजप आमदारांच्या घरी

ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजे भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार देवयांनी फरांदे यांनी त्यांचा भगवी शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर दोघ नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप आमदारांच्या भेटीनंतर राजाभाऊ वाजे हे भाजपच्या नाशिकमधील वसंत स्मृती कार्यालयात पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची भेट घेतली.

राजभाऊ वाझे यांच्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या भेटीचे कारण शहर विकासाचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खासदारांचा या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राजाभाऊ वाझे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. हेमंत गोडसे त्यावेळी विद्यामान खासदार होते.

लोकसभेत नाशिक मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जागेचा वाद झाला होता. त्यामुळे नाशिकची उमेदवारी खूप उशिराने जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ लोकसभा लढवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु उमेदवारी जाहीर होण्यात उशीर झाल्यामुळे भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

काही दिवसांपूर्वी पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी भगवी शाल असलेले स्टेट्स ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होत होती. परंतु ते त्याचा इन्कार करत होते. अखेरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत दाखल झाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)