Shirur Lok Sabha: मी साठीच्या पुढे गेलो, साहेबांचा मुलगा असतो तर…; शिरूरमधील सभेत अजित पवारांनी बोलून दाखवली खंत

पुणे (मुस्तफा आतार): मी साठीच्या पुढे गेलो. आता आम्हाला कधी तरी संधी आहे की नाही? आम्ही चुकीचे वागतो का? पवार साहेब आमचे दैवत आहे. प्रत्येकाचा काळ असतो. आता ८० वर्षाच्यापुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायची असते. मी साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती की नाही? मी साहेबांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनातील खदखद बोलून दाखविली. त्यावेळी शब्दाचा पक्का असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ केंदूर येथील सभेत ते बोलत होते. त्यावेळी मेघना बोर्डिकर साकोरे, जयश्री पलांडे आदी उपस्थित होते.

एकदा बारामतीचा विकास बघा

‘प्रत्येकाला कोणी तरी संधी दिली. मी सुद्धा अनेकांना आमदार, खासदार केले. आता खासदार अमोल कोल्हे यांना मी पक्षात घेतले. मी उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. चव्हाण साहेबांनी सुद्धा पवार साहेबांना संधी दिली. त्यामुळे पवार साहेब इथपर्यंत पोहोचले. मला साहेबांनी संधी दिली. मी काम दाखविले. म्हणून मला बारामतीकर निवडून देतात. साहेबांचा पुतण्या म्हणून मला मते मिळतात का,’ असा सवाल अजित पवार यांनी केला. एकदा बारामतीचा विकास बघा, असेही आवाहन त्यांनी केले.
बावनकुळेंचे अजित पवारांना उत्तर; प्रचारात विरोधकांबद्दल असे बोलावेच लागते त्यात काही चूक नाही!

आम्हाला आशिर्वाद द्या

‘काही निर्णय मी घेतले. आम्ही सर्वांनी पवार साहेबांना विनंती केली. तुम्ही ८४ वर्षांच्या पुढे गेला. आम्हाला परवानगी द्या. छगन भुजबळ, मी, प्रफुल्ल तटकरे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ असे सर्व मिळून चांगले राज्य चालवू. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी ‘साहेबांनी सांगितले ठीक आहे. मी राजीनामा देतो. मला सुद्धा कोणावरी तरी जबाबदारी द्यायची आहे. तुम्ही राज्य चालवा,’’ अशी अंतर्गत बाबही अजित पवार यांनी उघड केली.

हू की चू केले नाही

‘तुमचे साहेबांवर प्रेम आहे. पण तुम्ही साहेबांना या वयात सोडायला नको होते’, असे काहींनी मला सांगितले. ‘मी सोडत नव्हतो. तुम्ही घरी बसा. तब्येतीला सांभाळा. मार्गदर्शन करा. कोठे चुकले तर कान धरा. कोठे सुचवायचे असेल तर सुचवा. ३० ते ३२ वर्ष ऐकत आलो. तुम्ही म्हणाल ते केले. २००४ ला मुख्यमंत्री पद मिळत होते ते सोडले. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपमध्ये जायचे जायचे असे प्रत्येकवेळी तुम्ही सांगाल तसे वागलो. तरीही आम्ही हू की चूक केले नाही अशा शब्दांत अजित पवार यांनी पवारांचा शब्द खाली पडू दिला नसल्याचे वास्तव सांगितले.

शब्दामुळे ७२ तासांच्या सरकारमध्ये

पहाटेच्या शपथविधीमागील गुपित अजित पवार यांनी सभेत जाहीर केले. ‘मी शब्दाचा पक्का आहे. शब्द दिला तर बदलत नाही. मला असेच एकदा बैठकीला घेऊन गेले. त्यावेळी अमित शहा यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तू उपमुख्यमंत्री, असे मला सांगण्यात आले. पालकमंत्रीपद कोणाला, कोणती खाते कोणाला हे सगळे ठरले. दिल्लीला एका उद्योगपतीच्या घरी सहा बैठका झाल्या. पण मुंबईत आल्यावर धोरण बदलले. साहेब म्हणाले, ‘आपण शिवसेनेसोबत जाऊ.’ पण मी दिलेला शब्द पाळला. ७२ तास का होईना सरकारमध्ये गेलो. ते सरकार चालले नाही. पण मी शब्द पाळला,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी त्या शपथविधीबाबत भाष्य केले.