शरद पवारांचे 7 खासदार तुमच्या पक्षात येणार आहेत? अजित दादांचं थेट उत्तर, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनीच माध्यमांसमोर येऊन तसं काही झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे आरोप खोटे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

तुम्ही धादांत खोटं बोलत आहात. यामध्ये स्वत: तिथल्या तीन ते चार खासदारांचं, निलेश लंके, अमर काळे आणि अजून एक कोणीतरी, त्यांनी स्वत: बाईट दिलेला आहे की, आमच्याशी खासदार सुनील तटकरे किंवा कुणीही संपर्क साधलेला नाही. तुम्ही ज्यांची विश्वासाहर्ता आहे अशांची नावे घेत चला. त्यामुळे पुराव्यासहीत जर तुम्ही म्हणताय की, अजित पवारांनी केलं, अहो पण ती लोकं सांगत आहेत की, तसं काही झालेलं नाही. मग उगाच कशाकरता आरोप करायचा? आज 20 ते 22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर काय म्हणाले?

“मी आमदार सुरेश धस यांना सांगितलं आहे की, तुम्ही नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही एसआयटीला द्या. ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली तपास होता त्यांना ते पुरावे द्या. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे, त्यामुळे त्यांना पुरावे द्यायला सांगितले आहे. याबाबत माझी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“सरपंच हत्या प्रकरणात तीन वेगवेगळ्या तपास यंत्रणा फार बारकाईने चौकशी करत आहेत. कारण उद्या रिपोर्ट देत असताना कोणतीही तफावत आढळली तर तपासाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित व्हायला नको. त्यामुळे फार बारीकपणे तपास सुरु आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे, तेवढीच काळजी आम्हालाही आहे. या प्रकरणात आम्ही राजकारण येऊ देणार नाही आणि कुणालाही पाठिशी घालणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)