Sharad Pawar : मविआचे ‘भीष्माचार्य’ शरद पवार यांचं विधानसभेच्या जागांबाबत मोठं भाकीत, थेट आकडाच सांगितला

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या जागांबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकासआघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी महाविकासआघाडीच्या जागांबाबत भाकीत वर्तवलं ते म्हणाले की, ” 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच राज्यात एक मोठी शक्ती उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून ते पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी 225 हून अधिक जागा जिंकेल”.

राज्य चुकीच्या लोकांच्या हाती

शरद पवार पुढे म्हणाले की,” महाराष्ट्र सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे. पण लोकसभा निवडणुकीत जनतेने बदल दाखवला. महाराष्ट्रात एकूण 48 खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत विरोधकांचे सहा लोकप्रतिनिधी निवडून आले. परंतु त्यातले 4 राष्ट्रवादीचे होते. राज्यात बदल व्हावा असं जनतेला वाटत आहे. 48 जागांपैकी 31 जागांवर आपला विजय झाला. त्यात राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत”.
Autorickshaw Fare: मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार? सीएनजीच्या दरवाढीनंतर ऑटोरिक्षा युनियनची भाडे वाढीची मागणी

खासदार अमोल कोल्हेंनी सांगितली होती आकडेवारी

राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील बुधवारी ( 10 जुलै) आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील असं विधान केलं.आता अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील भविष्यवाणी केली आहे.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. त्यामध्ये राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर महायुतीला विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांना अपयश आलं आहे. अशातच आता सर्व राजकीय आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्षं लागलेलं आहे. पुढील तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.