Sharad Pawar: गांधींनी इंग्रजांना घालवलं तर मोदी काय चीज आहे? पवार मोदी-शहांवर बरसले

पुणे: शिरूर लोकसभेच्या सांगता सभेला शरद पवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फैलावर घेतलं. नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ‘नरेंद्र मोदी काय चीज आहे?’, असा सवाल करत पवारांनी बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांची टिंगल टवाळकी मोदी-शहा करत आहेत, असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. सोबतच देशासाठी नरेंद्र मोदी यांचं काय योगदान आहे, असा जाबही त्यांनी विचारला आहे. एकूणच शरद पवार या सभेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच बरसले.

शरद पवार यांची आज सांगता सभा पुण्यातल्या हडपसर येथे पार पडली. शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी ही सभा होती. परंतु, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. सभेसाठी शरद पवार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री बाळासाहे शिवरकर, अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार महादेव बाबर आणि इतर नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ज्या देशामध्ये ज्यांचं राज्य साम्राज्य कधी मावळणार नाही, असं म्हणारे इंग्रज आपल्या देशात होते. त्या इंग्रजांनी आपल्यावर वर्षानूवर्षे राज्य केलं. त्यांचं राज्य घालवण्यासाठी संपवण्यासाठी देशातले कोट्यवधी लोक गांधींच्या विचाराने एकत्र आले आणि इंग्रजांची सत्ता घालवण्यात यशस्वी झाले. त्या इंग्रजांना गांधींनी घालवलं तर हे नरेंद्र मोदी काय चीज आहे? अशी बोचरी टीका शरद पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाई आणि गांधी परिवारावरून नेहमी टीका आणि आरोप करत असतात. पण, शरद पवार यांनी भाषणा दरम्यान राहुल गांधी यांचं आणि गांधी परिवाराचं तोंड भरून कौतुक केलं. शरद पवार म्हणाले, एक तरुण देशभरात पद यात्रा करत फिरत आहे. देशाला एक संघ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्याची टिंगल टवाळकी करत आहेत. गांधी आणि नेहरू परिवाराने देशाच्या स्वातंत्रासाठी मोठं योगदान दिलं. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काय केलं, असा थेट सवाल ही शरद पवारांनी केला.