बारामतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार शरद पवारदेखील उपस्थित होते. युगेंद्र पवार यांच्या नावाचा केक कापून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांनीदेखील युगेंद्र पवार यांना त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत काही सल्लेदेखील दिले. विशेष म्हणजे युगेंद्र पवार यांची माझ्याशी किंवा अजित पवार यांच्याशी तुलना करू नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
माझ्या लहानपणी वाढदिवस असला की…
आज युगेंद्रचा वाढदिवस आहे. तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या उपस्थितीत युगेंद्रचा केक कापावा, मला आनंद झाला. मी विचार करत होतो की, जमाना किती बदलत आहे. आजकाल लहान गावीसुद्धा केक येत आहे. माझ्या लहानपणी वाढदिवस असला गुळ-शेंगदाणा किंवा गुळ-खोबरं दिलं जायचं, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
युगेंद्रने आपल्या परीने जे काही…
गेली काही दिवसांपासून युगेंद्रने तुमच्यासोबतीने कामाची सुरुवात केली. त्याचा स्वभाव लोकांशी नम्रतेने वागण्याच आहे. लोकांशी सुसंवाद ठेवण्याचा त्याचा स्वभाव आहे. युगेंद्रने आपल्या परीने जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करावा. याबाबतीत तुम्ही लोकांनी मी असो किंवा अजित पवार असो यांच्याशी तुलना करू नका, असे आवाहन शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांना केले.
तुम्ही सर्वांनी त्याला साथ द्यायची आहे
आम्ही राजकारणात होतो तेव्हा सरकार आमचं असायचं. आज युगेंद्रला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. सरकार त्याच्या हतात नाही. कष्ट करायचे, माणुसकीचे संबंध ठेवायचे, लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल, तेवढा ठेवायचा, असा उपदेश शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना दिला. तसेच तुम्ही सर्वांनी त्याला साथ द्यायची आहे. सत्तेची अपेक्षा आपण करता कामा नये, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
आम्हाला अक्षता टाकायची संधी द्या, लग्न करा
विशेष म्हणजे पुढे बोलताना शरद पवार यांनी मिश्किल भाष्य करत युगेंद्र पवार यांना लग्न करण्याचाही सल्ला दिला. एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं. आम्हाला अक्षता टाकायची संधी द्या. लग्न करा. लांबवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार लागतो. त्याचा विचार युगेंद्र गांभीर्याने करतील, असे म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना लग्नाचा सल्ला दिला.