माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आला. त्यावर ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला होता. संजय राऊत यांनी तर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देणं हा महादजी शिंदे यांचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. तसेच शरद पवार यांनी शिंदे यांना पुरस्कार नको द्यायला होता असंही संजय राऊत म्हणाले होते. पण आज एका कार्यक्रमात शरद पवार आणि राऊत एकाच मंचावर होते. यावेळी राऊत यांनी तुफान टोलेबाजी करतानाच शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. शरद पवार हेच आमचे योद्धे आहेत. तेच आमचे महादजी शिंदे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सामनाचे पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांचा मुक्तकंठाने गौरव केला. मराठी माणूस कायम दबलेला असतो. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे. मराठी माणसाने छाती काढून राहिलं पाहिजे. आक्रमक राहिलं पाहिजे. तसेच आमचे शरद पवार आहेत. शरद पवार आमचे योद्धा आहेत. आमचे नेते आहेत. आमचे सेनापती आहेत. ते महादजी शिंदे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीची गुलामी पत्करली नाही
महादजी मोठे व्यक्ती होते. योद्धा होते. शूरवीर होते. त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर बादशाहला नाचवलं. त्यांनी दोनदा दिल्ली जिंकली. त्यांच्या अटी आणि शर्तीवर दिल्लीचा बादशाह राज्य करत होता. महादजी शिंदे यांनी कधी दिल्लीची गुलामी पत्करली नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
महादजी शिंदेंचं मोठेपण टिकवायचं
महादजी शिंदे यांनी लाल किल्ल्याला वेढा घातला होता. ते महान होते. या मराठा सरदारांनी दिल्लीचे तख्त राखतो ही महाराष्ट्राला भूमिका दिली. आम्ही झुकत नाही, मोडत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. पानीपतातून उभे राहिले. त्याकाळी महादजी शिंदे ठरवायचे दिल्लीचे बादशाह कोण? ते बादशाह नेमायचे. ही मराठी माणसाची ताकद दिल्लीत आहे. आज आम्ही खुजं नेतृत्व पाहतो. म्हणून जो वाद झाला तो महादजी शिंदे यांच्या मोठेपणावरून झालं. त्यामुळे महादजी शिंदे यांचं मोठेपण आपल्याला टिकावयचं आहे, असं ते म्हणाले.
आताचेही जातील
यावेळी राऊत यांनी दिल्लीचं वैशिष्ट्ये सांगितलं. या दिल्लीने अनेक मोठी माणसं पाहिली. पण दिल्ली कुणाचीच नाही. दिल्लीत लोक येतात आणि निघून जातात. दिल्लीत कोणी स्वप्न पाहायला आला की संपला. दिल्लीत स्वप्न घेऊन यायचं नाही. दिल्लीत स्वप्न कधी पूर्ण होत नाही. दिल्लीत राजा येतो जातो. मोगल आले, ब्रिटिश आले. काँग्रेस आली, जनता दल आलं. आताचे आहेत, तेही जातील, असा चिमटा त्यांनी काढला.
उद्या कोणी गुजरातला जातील
दिल्लीत स्वत:चं काहीच नाही. दिल्लीत स्वत:ची हवा नाही. दिल्लीत स्वत:चे पाणी नाही. पाणीही बाहेरून येतं. दिल्लीतील माणसंही मूळ दिल्लीकर नाही. येतात आणि निघून जातात. केजरीवाल आले, केजरीवाल परत गेले. बाहेरचा माणूस. कुणी महाराष्ट्रात परत गेले, कुणी राजस्थानात परत गेले. उद्या कोणी गुजरातला परत जाईल. थांबायचं नाही इथे.
दिल्ली कुणाला कायमस्वरुपी जागा देत नाही. दिल्लीची जागा टेंपररी आहे हे लक्षात घेतलं तरच माणूस दिल्लीत राहिलेला सुखी होतो. दिल्लीला स्वत:चे कल्चर नाही. इतर राज्यांना त्यांची स्वत:ची संस्कृती आहे. स्वत;चं लोकसंगीत आहे. नाटक आहे, साहित्य आहे. दिल्लीला आहे? नाही. दिल्ली ही राज्यकर्त्यांची आहे. दिल्लीत राज्यकर्ता येतो. दिल्लीने जेवढा हिंसाचार पाहिला तेवढा कोणी पाहिला नाही. महाभारतपासून ते शिखांच्या हत्यांकांडापर्यंत दिल्लीने पाहिलं, असंही त्यांनी सांगितलं.