शरद पवारांना सर्वांत मोठा धक्का, 5 बडे नेते अजितदादांच्या गटात जाणार!

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच कारणामुळे वेगवेगळ्या पक्षांत इन्कमिंग आणि आऊटगोइंग चालू झाली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला माजी महापौर दत्ता दळवी यांच्या रुपात नुकताच मोठा फटका बसला आहे. दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. असे असतानाच आता जळगावमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. या जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षातील अनेक बडे नेते, माजी मंत्री, माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

2 माजी मंत्री, 3 माजी आमदार अजित पवार यांच्या पक्षात जाणार

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे 2 माजी मंत्री, 3 माजी आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील यांच्यासह चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, अमळनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे , माजी आमदार दिलीप वाघ आदी नेते तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

येत्या 3 मे रोजी होणार पक्षप्रवेश

शरद पवार यांच्या पक्षातील या नेत्यांचा येत्या 3 मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सर्वच नेत्यांच्या पक्षप्रवेशाबात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

शरद पवार गटाला मोठा फटका

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील अनेक नेते महायुतीच्या घटकपक्षांत जात आहेत. उद्धव ठाकरे यांनाही नुकताच एक मोठा फटका बसला आहे. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक होते. साध्या शिवसैनिकापासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. दक्षिण मुंबईत त्यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)