लोकसभा निवडणुकीत काका शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना जोरदार दणका दिला. आता पुतण्याविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या रिंगणात उतरवण्याची तयारी बारामतीत सुरु असल्याची चर्चा आहे. यासाठीच शरद पवार हे बारामतीचे ग्राऊंड मजबूत करण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांचा आत्मविश्वास आता दुणावला आहे, याचे मूळ कारण बारामती विधानसभेने खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेले ४८ हजारांचे मताधिक्य आहे.
लोकसभेला स्वत:च्या विधानसभा मतदारसंघातूनच मताधिक्य मिळाले असेल तर पुढील काळात तालुका पिंजून काढला तर शरद पवार गटासाठी विधानसभेला हे मैदान मारणं अशक्य नाही. सध्या अजित पवार यांचे देखील बारामतीवर काहीसे प्राबल्य दिसून येते. गत निवडणूकीत अजित पवार १ लाख ६५ हजारांच्या उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणूकीने त्यांना तारे दाखवले आहेत. सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य अजित पवार यांना विचार करायला लावणारे आहे.
तालुक्यातील सर्व संस्था अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. संस्थेचे पदाधिकारी अजित पवार यांच्या बाजूनेच आहेत. पण संस्था व पक्षीय पदाधिकाऱ्यांबाबत असलेला राग सर्वसामान्यांनी लोकसभा निवडणुकीत काढला होता. आता विधानसभेला तसे होऊ नये, यासाठी अजित पवार गटाली संघटनात्मक बांधणी करणे निकडीचे आहे. परंतु पक्ष अजूनही लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली, याचा जल्लोष बारामतीत झाला. पण त्यालाही लोकसभा निवडणूकीतील पराभवाची झालर होतीच. यातच आता शरद पवार यांचे वाढलेले दौरे अजित पवारांना देखील ऑन द फील्ड उतरण्यासाठी भाग पाडणार अशी चिन्ह दिसत आहेत.
बारामती: लोकसभा निकालानंतर विधानसभेला बारामतीत पाय घट्ट रोवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आता सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातच शरद पवारांनी बारामती तालुक्याचा तीन दिवसीय दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटी देण्यासोबतच दुष्काळी परिस्थितीचा देखील आढावा घेतला होता. मंगळवार १८ जूनपासून पवार पु्न्हा बारामतीत तळ ठोकून असणार आहेत. पवार यांच्या या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मात्र टेन्शन वाढणार आहे.