Sharad Pawar : मी घरी बसणारा नाही, निकाल लागताच शरद पवार यांची डरकाळी

‘बचेंगे तो लढेंगे’ असा करारा जबाब पानीपतच्या लढाईत नरवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीब खान याला दिला होता. या उत्तरानेच शत्रूला कापरं भरलं होतं. आता महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेले असताना, त्यांच्यातील सर्वात तरुण शरद पवार यांनी हार मानण्यास नकार दिला आहे. मी घरी बसणारा नाही, असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्यातील हे फाईट स्पिरिट भल्याभल्यांना आचंबित करणारच नाहीतर एका वादळाची नांदी आहे, असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही, काय म्हणाले थोरले पवार?

कराडमधून शरद पवार कडाडले

‘काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील.’ असा दुर्दम आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेने आता राष्ट्रवादीत पुन्हा नवीन उत्साह संचारला आहे. त्यामुळे ‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’, असा थेट संदेश गेला आहे.

अजितदादांना असे दिले उत्तर

कुणी तरी बारामतीत उभं राहणं आवश्यक होतं. तिथं कुणीलाही उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता. दोघांची तुलना होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे, असे उत्तर त्यांनी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या लढतीवर दिले. सकाळी अजितदादा या मुद्दावर भावनिक झाले होते.

वैचारिक अंतर केले अधोरेखित

आमच्या लोकांची जनरेशन आहे. आमच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार स्वीकार आहे. त्या विचाराने काम करणारा मोठा वर्ग भाजपसोबत आहे. आमच्यातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढल्या त्यांना यश मिळालं. त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर चव्हाण साहेब किंवा गांधी नेहरूच्या विचाराने काम करणारे होते. पण त्यांनी संपर्क आणि सहयोग भाजपसोबत ठेवला हे नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांनी त्या काळातील जनसंघ आणि भाजपशी संबंध ठेवला नाही. त्यांनी त्यांच्याशी शेवटरपर्यंत वैचारिक अंतर ठेवलं, हे त्यांनी ठासून सांगितले. त्यामुळे येत्या काळात वैचारिक लढाईवर मोठा जोर असणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)