शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल, जयंत पाटलांनी यादीच सांगितली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर होते, यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार कृषीमंत्री होते, त्यांच्याकडे सहकार खातं होतं, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला. अमित शाह यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

देशाच्या गृहमंत्र्यांनी मुंबईला येऊन शरद पवार यांनी आपल्या कारकिर्तीमध्ये काय केले असा सवाल उपस्थित केला, देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी शरद पवार यांनी दिली, देशात सर्वांना माहीत असणारा कृषी मंत्री कोण असा प्रश्न विचारला तर अनेकजण उत्तर देतील शरद पवार म्हणून, आधारभूत किंमत वाढविण्याचे काम पवार साहेबांच्या नेतृत्वातील कृषी खात्याने केले. केरळमधील नारळ आणि सुपारी पासून देशातील सर्व पिकांना पवार यांनी आधारभूत किंमत मिळवून दिली. साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचे संकट घोंगावत होतं, ते संकट मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी घालावलं.

देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पवार साहेब यांच्याबद्दल जे आदराचं स्थान आहे. त्याला धक्का लावण्याचं काम केलं जात आहे. पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हा प्रश्न त्यांनी वारंवार उपस्थित करू नये. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेब यांनी गुजरातमध्ये जावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले, याची माहिती नरेंद्र मोदी यांना आहे, कदाचित शाह यांना ही माहिती नसावी.  पवार साहेब यांच्या बाबत महाराष्ट्रात सहानभूती आहे, म्हणूनच अमित शाह हे वारंवार टीका करत आहेत. पवार साहेब  यांना जेव्हडे टारगेट केले जाईल तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रातील जनता पवार साहेब यांच्या पाठीमागे उभी राहील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एसटीमध्ये झालेल्या भाडेवाढीवरून देखील त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.  एसटीची भाडेवाढ म्हणजे महिलांना दिलेला सवलतीचा पैसा वेगळ्या मार्गाने वसूल करण्याचा प्रयत्न आहे असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)