‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’; गॅस दरवाढीवर शरद पवार गटाचा सणसणीत टोला, खुल्या पत्रातून मोदी सरकारवर निशाणा

शरद पवार गटाचं गॅस दरवाढीवर टीकास्त्रImage Credit source: गुगल

गॅस दरवाढीनंतर देशभरात नाराजी पसरलेली असतानाच आता विरोधकांनी सुद्ध मोदी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने जनतेसाठी मोदी सरकारकडून एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात मोदी सरकारच्या धोरणावर तिरकस टीका करण्यात आली. मोदी सरकारच्या धोरणाचा समाचार घेतानाच जनतेला आता ही दरवाढ सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे या खुल्या पत्रात

शरद पवार गटाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर हे पत्र शेअर केले आहे. गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र, असं या पत्राचं शीर्षक आहे. या पत्रातील मजकूरानुसार, ” प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.”

असा मजकूर या पत्रात लिहिला आहे. या पत्रातून शरद पवार गटाने मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या धोरणावर शालजोडीतून राग, संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. या पत्रातून मोदी सरकारला चिमटे काढण्यात आले आहेत. मोदी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली. 8 एप्रिल, आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)