लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शरद पवार यांनी ३ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. तसेच सरकारचे नागरिकांकडे दुर्लक्ष कायम राहिले, तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर पवार यांनी पुणे जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात दौरे केले. या दौऱ्यातील अनुभवांवरून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
मी १२-१३ जून रोजी पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र, दौऱ्यावेळी शेतकरी-ग्रामस्थांशी संवाद साधला असता, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजनाही सुचविल्या, असे पवार यांनी नमूद केले आहे.
पुण्यातील तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज व्यक्त करताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच मृद व जलसंधारणमंत्री, पाणीपुरवठामंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे, अशी विनंती केली आहे. तसेच बैठकीला संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, असेही पवार यांनी म्हटले आहे.