पुढे बोलताना पवार म्हणाले की, यावेळच्या निवडणुकीला पहिल्यांदा मी असे अनुभवले की, गावात लोकं बोलत नव्हती. एक प्रकारचे दहशतीचे वातावरण होते की काय माहित नाही. मी असे कधीच इतक्या वर्षात पाहिले नाही. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभेत तुम्ही लोकांनी मला कितीदा मते दिली. १९६७ सालापासून सतत ५६ वर्ष निवडून येणारा देशात दुसरा प्रतिनिधी नाही. आणि ही किमया तुम्ही लोकांनी केली. आणि तेच काम कालच्या निवडणुकीमध्ये केले. तुमच्यापैकी अनेक लोक शांत होते. मात्र मतदान करायला गेल्यानंतर कोणते बटन दाबायचे, हे तुम्हाला सांगावे लागले नाही. नेमके बटन तुम्ही दाबले आणि मतांचा विक्रम केला. आणि देशात एक संदेश गेला की, बारामती मतदारसंघ व येथील मतदार साधेसुधी नसून समंजस, शहाणे आहे आणि त्यांना कोणता बटन दाबायचे आहे ते माहिती आहे.
अजित पवारांवर निशाणा…
याच्या आदी अनेक वर्ष आपण विकासाच्या कामात लक्ष घातले. अलीकडच्या काळात मी लक्ष देत नव्हतो. दुसऱ्यांच्या वर जबाबदारी टाकली होती. पण आता याच्यामध्ये अधिक लक्ष घालावे लागेल, असं म्हणत पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
…त्या ऐवजी ते नवीन नवीन कायदे करतात
काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की, ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर लोकांचे जीवन सुधरवण्यासाठी केला पाहिजे. त्या ऐवजी ते नवीन नवीन कायदे करतात. आणि ते कायदे लोकांच्या हिताचे नाहीत, असे म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले पत्र
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातले आहे. त्यांनी याबाबत काही ना काहीतरी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यांनी काहीतरी निर्णय घेतला तर आनंदच आहे. जर का तसा निर्णय घेतला नाही. तर लोकशाहीमध्ये जनतेच्या जोरावर योग्य पद्धतीने काय सांगायचा मार्ग आम्हाला माहिती आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.