लोकसभेला सांगलीत झालेली चूक विधानसभेला टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यासाठी जागावाटपाचा मुद्दा निकाली काढण्यात आलेला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील ८ जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे. त्यानुसार काँग्रेस आणि शरद पवार गट जिल्ह्यातील प्रत्येक तीन जागा लढवेल. तर ठाकरेसेना दोन जागांवर लढेल, असा फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरत असल्याचं वृत्त इंडिया टीव्हीनं दिलं आहे.
महाविकास आघाडीत सुरु असलेल्या चर्चेनुसार पलूस-कडेगाव, जत, सांगली अशा तीन जागा काँग्रेसला मिळू शकतात. पैकी पलूस-कडेगावातून विश्वजीत कदम, जतमधून विक्रम सावंत आणि सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. पलूस-कडेगाव आणि जत या दोन्ही जागा काँग्रेसकडेच आहेत. इथल्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल.
शरद पवार गटाला इस्लामपूर, तासगाव-कवठे महाकाळ, शिराळा या तीन जागा सुटण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. त्यामुळे इथे पक्षाची चांगली ताकद आहे. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील, तासगावातून रोहित पाटील आणि शिराळ्यातून मानसिंग नाईक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.ठाकरे गटाला सांगलीत दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. खानापूर आणि मिरज विधानसभेच्या जागा ठाकरेंना मिळू शकतात. खानापूरमधून चंद्रहार पाटील यांना संधी मिळू शकते. त्यांनी नुकतीच लोकसभा लढवली आहे. त्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. मिरजमधून सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत खानापूरची जागा शिवसेनेनं जिंकली होती. तर मिरजमध्ये भाजपला यश मिळालं होतं.