सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढविली, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, अखेर….

एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवर राजकारण तापले असताना पेणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निष्ठावंत सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर अद्यात तरुणांनी हिरवी चादर चढवून त्या मजार असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक कृत्य घडले आहे. या प्रकरणामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आली असून या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील पायदळाचे सरदार असलेल्या वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून ती मजार असल्याचा बनाव करणाऱ्याचा डाव जागरुक शिवप्रेमींना हाणून पाडला आहे. पेण शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात शिवकालीन सरदार वाघोजी तुपे यांची समाधी आहे. शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी काही समाजकंटकांनी एकत्र येऊन सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढविली आणि फुले वाहून ती मजार असल्याचा बनाव केला. यावेळी अशा घोषणा दिल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.

जमावबंदीचे आदेश झुगारले

त्यानंतर शिवप्रेमींनी समाधीवरील हिरवी चादर हटवून पोलीसांच्या ताब्यात दिली. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. 25 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तरीही शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी काही धर्मांधांनी जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून घोषणाबाजी केली.

 हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, गुन्हा दाखल

यासंदर्भात शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हा संघटक नरेश गावंड, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस स्वरूप घोसाळकर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अच्युत पाटील, मयूर वनगे, रोशन टेमघरे, रोशन पाटील यांच्यासह शिवप्रेमींनी पेण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. नरहरी सरदार वाघोजी तुपे यांचे वंशज विवेक मारुती तुपे यांनी देखील पेण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अखिल पठाण, दानिश पठाण, रफिक तडवी आणि इतर चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 298, 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)