जयंत पाटलांच्या हातातील स्टेअरिंगवरून संजय राऊत यांची कोपरखळी, म्हणाले  उद्या 10 वाजता…

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महायुती आणि महाविकासआघाडीत मुख्यमंत्री कोण असणार यावरुन चर्चा सुरु आहेत.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रि‍पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय हा महाराष्ट्र मुंबईतून होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, ते दिल्लीतून मुंबईला येतील. उद्या सकाळी १० नंतर मी मुख्यमंत्री कोण असेल हे सांगेन, असे विधान संजय राऊतांनी केले.

महाराष्ट्रात महिलांनी गुलामी विरोधात बंड करुन मतदान केलेलं आहे. आम्ही १६० जागा जिंकतो आहे. यावर आमची सर्व घटक पक्षांसोबत चर्चा केली आहे. मी लवकरच शरद पवारांना भेटणार आहे. आम्ही १६० जागा जिंकल्यानंतर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले, तरी निवडणूक पूर्वी ज्यांचं बहुमत आहे, त्यांना राज्यापालांना बोलावावं लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील

मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्र मुंबईतून होईल, काँग्रेसचे जे प्रमुख नेते दिल्लीतून येथे येतील. त्यामुळे त्यांना मँडेट घेऊन यावं लागेल. आम्ही कोणताही वेळ न घालवता मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण आहेत. घाईघाईत ते गौतम अदानीलाही मुख्यमंत्री करतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात”

“मी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार आहे. महाविकासआघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निषणात आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येतं. हा माझा अनुभव आहे. काही लोकांना ड्रायव्हिंग पॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं”, असे संजय राऊत म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)