Sanjay Raut : होय, युद्ध सुरू झालंय, पाकिस्तानवर बॉम्ब टाकलाय, नेते पळून गेलेत..संजय राऊतांनी सरकारला धु धु धुतले

संजय राऊतांचा घणाघातImage Credit source: टीव्ही ९ मराठी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारचे धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांच्या चेहर्‍यावर कोणतेही दुख आणि चिंता दिसत नसल्याचा आरोप केला. त्यांनी विशेष अधिवेशनात भाजप सरकार काश्मीरविषयावर विरोधकांना चर्चा करू देणार नाही असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा तोंडसुख घेतले.

पंतप्रधान तर खुशमिजास, कुठलीच चिंता नाही

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या भूमिकेवर राऊतांना आसूड ओढला. हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान तात्काळ बिहारला गेले. तिथल्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुष मिजास आहेत. पुलवामा हत्याकांडानंतर ही भाजपच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर दुख दिसले नाही. मोदींच्या चेहर्‍यांवर चिंता दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.

आम्हीच चिंतेत आहोत

पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. आम्हीच चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटा त्यांनी काढला. त्यांनी यावेळी पंतप्रधानांच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नसल्याचे ते म्हणाले.

होय युद्ध सुरू आहे…

यावेळी त्यांनी यु्द्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. घाबरून नेते आणि दहशतवादी पाकिस्तान सोडून पळाले आहेत, पण हे सर्व मीडियात सुरू असल्याचा चिमटा काढला. प्रत्यक्षात काहीच झालं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मुंबईत 9 तास घालवतात. गौतम अदानी यांच्या प्रकल्पाचे उद्धघाटन करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

विरोधकांची कीव वाटते

अमित शाहांना अजून त्या पदावर का बसून ठेवलंय, असा सवाल त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत जे दहशतवादी हल्ले झाले. ज्या घटना घडल्या, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा का मागण्यात आला नाही. ते अद्यापही त्या पदावर का आहेत, असा सवाल त्यांनी केला. विरोधकांनी अद्यापही त्यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याने आपल्याला विरोधकांची कीव वाटते, असे ते म्हणाले. विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागावा आणि मग समर्थन द्यावे असे ते म्हणाले. हे सरकार नाहीत, हे नराधम आहेत. हे तसे सरकार नाही जे 10 वर्षांपूर्वी होते. विरोधकांनी त्यांच्या चुकांना पाठिंबा देऊ नये, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)