“जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का? कोणामुळे कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीत जागा वाटप इतक्या विलंबाने झालं तर अस्वस्थतता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही” असं संजय राऊत म्हणाले. “या उलट महायुतीत दोन महिन्यांपूर्वीच जागा वाटप झालं होतं. बाकी त्यांच्या चर्चा सुरू असतील. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे. ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या. त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सीट शेअरिंग झालं. आता आम्हाला कळतंय. तेव्हा आम्ही सांगत होतो. पण त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच सांगतो” असं संजय राऊत म्हणाले.
आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना काही गंभीर आरोप केले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जो विलंब लागला, त्यामागे काही कारस्थान आहे का? असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “वाद सुरू होताच. त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त हवा होत्या. पण काँग्रेसच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या. आम्ही जास्त जागा जिंकलो. पण आता त्यात कशासाठी वाद करायचा. जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला, त्यात मिस्टर वडेट्टीवार होतेच की. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर बरं झालं असतं” असं संजय राऊत म्हणाले.
त्या जागेवर 17 दिवस घोळ घातला
“आम्ही मागितलेल्या जागा काँग्रेस या क्षणी हरलेली आहे. उदा. चंद्रपूरची जागा. किशोर जोरगेवार. हे अपक्ष आमदार होते. ते शरद पवारांकडून लढायला तयार होते. त्यांनी पत्र दिलं होतं. ती जिंकणारी जागा होती. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि अनिल देशमुख वारंवार समजावत होते ही जागा जिंकणारी आहे. किशोर जोरगेवार निवडून येतील. ते आमच्याकडून लढणार आहेत. ती जागा सोडा. ती जागा सोडा. त्या जागेवर 17 दिवस घोळ घातला. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले. विजयी झाले. अशा अनेक जागा आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
‘लोकसभेतील विजय वेगळा आहे’
“काही लोकांना वाटत होतं आम्हीच जिंकू. आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. देशातील वातावरण बदललंय. आमचं म्हणणं होतं की आपण काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठं आहे. लोकसभेतील विजय वेगळा आहे. लोकसभेनंतर सत्ताधारी सावध झाला आहे. त्यामुळे जागा वाटपात आमचं-तुमचं न करता लढू. पण याला सर्वच जबाबदार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
‘कोणाला तरी मुख्यमंत्रीपद हवं होतं’
“कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही आग्रहाने मागत होतो. आम्ही सहावेळा जिंकलेली आहे. ती आली असती तर जिंकलो असतो. काही ठिकाणी वाटत होतं राष्ट्रवादी जिंकेल. काँग्रेस जिंकेल. पण सकारात्मक चर्चा काही वेळा होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपआपल्या जागा हव्या होत्या, कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं. किंवा अजून काही असेल” असं संजय राऊत म्हणाले.
‘…तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल’
“काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही. तो करायला पाहिजे होता. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे” असं संजय राऊत म्हणाले. “इंडिया आघाडीबाबत तेजस्वी यादव, अखिलेश यादव, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी होती. ती झाली नाही. तसं महाराष्ट्रात विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे. तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल” असं संजय राऊत म्हणाले.