Sanjay Raut : राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, आता मनसेसोबत थेट…

संजय राऊत, मनसे-शिवसेना युतीImage Credit source: टीव्ही ९ मराठी

मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षात युतीच्या चर्चांनी राज्यात मोठे वादळ उठले होते. भाजपासह महायुतीला राज्यात पर्याय देण्यात येणार अशी चर्चा रंगली होती. तर मुंबईतील मराठी माणसाच्या आवाजाला बळ मिळणार असे सांगण्यात येत होते. पण एका महिन्यात हा विषय रेंगाळला. दोन्ही नेते परदेशात असल्याने त्यावर पुढे भाष्य झाले नाही. आता संजय राऊतांनी यांनी या थंड पडलेल्या विषयाला पुन्हा हवा दिली आहे. राऊतांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेनेची भूमिका सकारात्मक

संजय राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या युतीबाबत मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. किंवा राज ठाकरेंनी दुसरी मुलाखत दिली. म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असेल. उद्धव ठाकरे यांनीही मुलाखतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर गोड बोलतात. पण तसं नाही ना. मिठ्या मारतील. बाजूला बसतील. एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी करतील. पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का. तसं चित्र नाही. राज ठाकरे यांच्या तीन मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहीत आहे. आम्ही स्वत: उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर नातं जोडायला आम्ही सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलतं या पेक्षा ठाकरे काय बोलतात पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही, हे महत्त्वाचं आहे, असे राऊत म्हणाले.

मनसे आणि दिलसे युती

मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. दोघांवरही मराठी जनतेचं प्रेशर आहे. हे जसं प्रेशर भावनिक आहे, तसं राजकीय आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार आणि हक्क कायम ठेवायचा असेल तर ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड प्रोपरायटेड बाय अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि वगैरे वगैरे… आणि बाकीचे शेअर होल्डरच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. मराठी माणसाला ताठ मानाने या मुंबईत जगायचे असेल तर सर्व मतभेद, जळमटं आणि क्लिमिषे बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

मराठी माणसाचे अहित होणार नाही

उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे. माझी कालही चर्चा झाली आहे. आपण सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, असं आमचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनातील योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मागे हटता कामा नये तीच बाळासाहेबांना मानवंदना होती, असे वक्तव्य राऊतांनी केले. राज- उद्धव ठाकरे युतीची पडद्या मागची चर्चा बाहेर येईल ना. पडद्याच्या नाड्या तुमच्या हातात नाही. पडद्याच्या नाड्या कधी ओढायच्या हे दोन भाऊ ठरवतील. ठाकरे ठरवतील, असे राऊत म्हणाले.

ठाकरे आणि पवार हे ब्रँड

ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही. हे राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. हे जे ईस्ट इंडिया कंपनीचे मालक दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आमि पवार ब्रँड संपत नाही, तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही. मुंबई गिळता येणार नाही. त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा. नष्ट करा. वेगवेगळ्या माध्यमातून. त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं. त्यांचं चिन्ह काढलं. पक्ष काढलं. ही त्यांची भूमिका आहे, त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपला नाही. लोकं ठाकरे आणि पवारांच्या मागे आहेत, असा दावा राऊतांनी सकाळच्या पत्र परिषदेत केला.

मोदी आणि शाह ही नावं पुसली जातील

तुम्ही बोगस वोटर लिस्ट करून जिंकला. मी खात्रीने सांगतो या देशातून मोदी आणि शाह ही नावे पुसली जातील. कारण त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी काही केलं नाही. कट कारस्थानामुळे कोणी लक्षात राहत नाही. भरीव कार्य बाळासाहेब आणि शरद पवार यांनी केलं आहे. यशवंतराव चव्हाण ते भाऊराव पाटील यांना आपण विसरत नाही. तसंच एक निवडणूक जाऊ द्या मोदी शाह यांना लोक विसरतील. मोदी शाह राजकीय क्षितिजावर दिसत नाही, असा दावा राऊतांनी केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)