संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवाल

हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवालImage Credit source: social media

देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून संघ सेवेत कार्यरत आहे. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, असे उद्गार काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काढले होते. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी केली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना हे विधान केंल. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा शोध त्यांनी कुठून लावला? असा थेट सवाल विचारत राऊत यांनी मोदींना टोला हाणला. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही, असं राऊतांनी सुनावलं.

स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता

काल नागपूरमध्ये मोदींचं भााषण झालं. काय तर म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा शोध त्यांनी कुठून लावला? संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय? असा सवाल राऊतांनी विचारला. एकदा त्यांनी आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघाने काय केलं? दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. गांधी, पटेल, सरदार पटेल, सावरकर भगतसिंग यांच्या नेतृत्वात लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. मोदी म्हणतात तसा संघ यात कुठेच नव्हता. कधीच नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंध भक्त करत आहात, भ्रमिष्ट करत आहात. वेडे करत आहात. हा देश एक दिवस जगात वेड्यांचा देश, खोटारड्यांचा देश म्हणून एखाद्या यादीत यायचा, अशी सडकून टीका राऊत यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?

गुढीपाडव्या निमित्त नागपुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले.

गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज 100 वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)