Sanjay Raut : काश्मीरच्या दु:खद प्रसंगी सरकारमधील घटक पक्ष श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करतायत – राऊतांची टीका

सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारतर्फे गिरीश महाजन यांना पाठवलं असेल तर दुसरं कोणी जायची तिथे गरज नाही. यावरून तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारमधील वाद (सर्वांना) दाखवत आहात. आम्ही सगळे (आज बोलावण्यात आलेल्या) सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतोय,विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं आम्ही सांगतोय. पण काश्मीरच्या या दु:खद प्रसंगी महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. पहलगामच्या हल्ल्यानंतर देशभरासह महाराष्ट्रातील अनेक पर्यक काश्मीरमध्ये अकडले होते. त्या पर्यटकांसाठी गिरीश महाजन काश्मीरला गेले. मात्र त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ताबतडोब तिकडे गेले. त्यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला.

एकनाथ शिंदे पॅरलल गव्हर्नमेंट चालवतायत का ?

पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात डोंबिवली, पुणे, नवी मुंबईचे लोकं आहेत. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. काही जखमी तिथे आहेत. अजूनही काही पर्यटक काश्मीरमध्ये अकडलेत. सरकार म्हणून तिथे  ‘वन विंडो सिस्टीम’ असली पाहिजे. कोणीतरी 1 माणूस तिथे गेलाय, आणि तो तिथे सगळं हँडल करतो. यापूर्वीही आपण हे केलं आहे.

पण एकनाथ शिंदे पॅरलल गव्हर्नमेंट चालवतायत का ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकायला तयार नाहीत का ? हे अत्यंत दुर्दैव आहे. निदान अशा दु:खद प्रसंगी तरी कोणी अशी भूमिका घेऊ नये, असंही राऊतांनी सुनावलं.

संकटकाळी आम्ही सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे

सरकारच्या पाठिशी ठामपणे उभं राहून संकटकाळी हा देश एक आहे हे दाखवणं गरजेचं असतं. त्यामुळे या संकटकाळात सरकार जी भूमिका किंवा निर्णय घेईल, त्याच्या पाठिशी आम्ही सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे आहोत.यामध्ये कोणतही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, हाच सर्वपक्षीय बैठकीचा सूर असतो. अशा वेळेसे विरोधी पक्ष ज्या सूचना करतं, त्याचं पालन तुम्ही करणार असाल तर या बैठकीला महत्व आहे. सगळी अक्कल सरकार पक्षाकडे आहे, असं नसतं ना असं म्हणत राऊतांनी टोलाही लगावला. मात्र सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काश्मीर प्रश्नासाठी विशेष अधिवेशन घ्या

विविध प्रश्नांवर एक दिवसाचं अधिवेशन बोलावलं जातं, तसचं काश्मीरच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विेशष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी सूचनाही राऊतांनी केली. विरोधकांच्या सूचना, राष्ट्राची भूमिका यासंबंधी चर्चा घडवून देशाच्या , राष्ट्राच्या सर्वच पक्षीांना बोलण्याची संधी तिथे देण्यात यावी असंही ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)