पुण्यात महिलेवर झालेला अत्याचार हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? असा घणाघाती सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून यावेळी राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पुण्यात अपहरण, खून, बलात्कार अशा घटना वाढल्या आहेत. सत्ताधारी पक्षातल्या महिला नेता इतरवेळी कायम रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मात्र काल पुण्यात झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर या महिला नेत्यानी थातुरमातुर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर दुसर कोणी असतं, महाविकास आघाडी, कॉंग्रेस, उबाठा तर याच महिलांनी मंत्रालयाच्या दरात गोंधळ घातला असता अशी टीका करत पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला.
तसंच आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. राज्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा आरोप करत दुर्घटना घडल्यानंतर अॅक्शन मोड येण्याची वरवरची नाटके असतात. म्हणजे काय बलात्कार झाल्यानंतर अॅक्शन मोड वर येता का? तोपर्यंत तुम्ही काय करत होता? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.