“अजित पवार तटस्थ वृत्तीचे नेते नाहीत. निष्पक्षपणे जे काम करायचं असतं त्यातले ते नाहीत. धनंजय मुंडे हे सुद्धा त्या विचाराचे तटस्थ किंवा न्यायबुद्धीचे नेते नाहीत. बीडमध्ये जे चाललंय ते एकमेकांचा हात धरून घडतंय. अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व एका तटस्थ माणसाकडे द्यायला हवं होतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलले.
“महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही तटस्थ नेता दिसत नाही. संतोष देशमुख यांचे मारेकरी आजही बाहेर आहेत. वाल्मिक कराडला लवकरच बाहेर काढलं जाईल. आज आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते तेव्हा शांत झालेले असतील. वाल्मिक कराडला राजकारणात आणलं जाईल आणि मराठा विरुद्ध ओबीसी या नव्या संघर्षात वाल्मिक कराडला राजकारणात फडणवीस त्याला प्यादा म्हणून वापरतील” असा दावा संजय राऊत यांनी केला.
अजितदादांचा दम पोकळ आहे
“राज्यात जातीय राजकारण केलं जातय. त्यासाठी असंख्य खंडणी, खून, बलात्काराचे आरोप आहेत, त्यांना वापरलं जातं, हे भाजपचं चारित्र्य आहे” असं संजय राऊत म्हणाले. “ही कारवाई भ्रष्टाचारासंबंधात अन्य गुन्ह्या संदर्भात अजित पवार यांच्यावर झाली आहे. मकोका म्हणणार नाही. पण आर्थिक पातळीवरचे गुन्हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर झालेले आहेत. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगास्नान केलं आहे. त्यामुळे याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही ही भाषा योग्य वाटत नाही. तुम्ही स्वत: सुटलेले आहात हो. अजितदादांचा दम पोकळ आहे. फडणवीस यांचा दम पोकळ आहे. शिंदेंचा दम पोकळ आहे. या राज्यात शासन नाही, प्रशासन नाही” असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह याच्या मनात खोट होती
“आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रीपदही दिलं नाही. कारण भाजपच्या मनात खोट होती. खासकरून अमित शाह याच्या मनात खोट होती. त्यांना आमची पार्टी फोडायची होती. अमित शाह यांनी होऊ दिलं नाही. कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत होते. मात्र शिवसेना असेपर्यंत ते होणार नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले.