वरळी हिट अँड रन प्रकरणात सत्ताधारी शिवसेना नेत्याच्या मुलाचे नाव पुढे येताच विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारला थेट सवाल केला आहे. राऊत म्हणाले, ‘हिट अँड रन केस मधील मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते ठाणे जिल्ह्यातील आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उपनेते देखील आहेत. मग पोलिसांनी २४ तासांत त्याच्या वडिलांना अटक करुन गुन्हाच केला आहे.’
‘मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते. हिट अँड रनमधला मुख्य आरोपी तर फरारच आहे ना? दारुच्या नशेत मराठी महिलेला गाडीखाली चिरडणारा हा मिहीर शहा मुंबई पोलिसांच्या हातून सुटतोच कसा? हा फरार आरोपी सुरतला गेला आहे की त्याला गुवाहाटीला लपवला आहे? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा खुलासा करावा, असे राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान राऊतांनी वरळीच्या रस्त्यावर ज्याप्रकारचा हिंसाचार झाला. दारुच्या नशेत हे काय चालू आहे? मुंबईत आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही असे मला खात्रीनं सांगावसं वाटतं’ असे देखील राऊतांनी म्हटले आहे.
३७० कलम हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये अधिक अस्थिरता – राऊत
जम्मू-काश्मीरमध्ये पाच जवान हुतात्मा झाले, पाच जवानांवर ज्याप्रकारे हल्ला झाला ते हे सरकार आल्यापासूनच जवानांच्या ताफ्यावर झाले आहेत. प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, तेव्हा देखील जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर हल्ले झाले त्यात जवान शहीद झाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करत आहेत की जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे शांतता नांदते पण ३७० कलम हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे.