Sanjay Raut: काशीपुत्र, भगवान मोदी पिछाडीवर, हा यूपीचा नाही देशाचा कल, राऊतांकडून भाजपची खिल्ली

मुंबई: देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी एनडीएला मोठा धक्का बसताना दिसत आहेत. या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी मोठी लीड घेतल्याचं चित्र आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात आणि राज्यात कोणाचं सरकार येईल हे सांगितलं आहे. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात मविआचं सरकार असेल असा दावा त्यांनी केला आहे.

जो निकाल लागायचा तो लागेल, प्रत्यक्ष भगवान, इश्वराचे अवतार, काशीपुत्र नरेंद्र मोदी हे त्यांच्या मतदारसंघात तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेशचा नाही देशाचा कल आहे. साधारण दोन वाजता कल स्पष्ट होईल.

इंडिया आघाडी झपाट्याने पुढे जात आहे. एक्झिट पोलचे आकडे आले होते, ते पार करुन इंडिया आघाडी खूप पुढे गेलेली आहे. मझ्या आकलनानुसार काँग्रेस १५० पर्यंत पोहोचेल, असं चित्र दिसत आहे. कँग्रेसने १५० चा आकडा गाठणे म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो.

कोणत्याही परिस्थितीत मविआ राज्यात पुढे राहिल आणि देशात इंडिया आघाडी २९५ जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. एनडीएला बहुमत मिळेल असं दिसत नाही.

नंदुरबारला काँग्रेसचे तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे १ लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. ते कोणी तोडू शकेल असं वाटत नाही. नाशकात राजाभाऊ वाजे हे ८० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचं मताधिक्क्य कोणी तोडू शकेल असं वाटत नाही, असे अनेक मतदारसंघ आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी पुढे राहिल, ४ वाजता चित्र स्पष्ट होईल की सरकार कोणाचं असेल आणि पंतप्रधान कोण होईल, असंही संजय राऊत म्हणाले.