Sangli Marathi News : सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रूपनर विवाहानंतर लगेचच देशाच्या सेवेसाठी सीमेवर परतले. त्यांचे वडील, काका आणि भाऊ आधीपासूनच सीमेवर तैनात आहेत. रुपनूर कुटुंबीयांनी प्रज्वल यांचे औक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रज्वल 2020 मध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होण्यासाठी ते भुज येथे रवाना झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिंमत रूपनूर 2020 ला मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते. प्रज्वल रुपनूर यांचा 14 एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला. दरम्यान ऑपरेशन सिंदुरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भुज येथे हजर राहण्यासाठी रवाना झाले.
घरातून निघताना रुपनर कुटुंबीयांनी जवान प्रज्वल रुपनर यांचे औक्षण केलं. तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगुले, हर्षद पाटील, वैभव माने, अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रूपनूर विवाहानंतर लगेचच देशाच्या सेवेसाठी सीमेवर परतले. त्यांचे वडील, काका आणि भाऊ आधीपासूनच सीमेवर तैनात आहेत. #SangliNews #Sangli pic.twitter.com/i9NCNGBUAF
— Harish Malusare (@harish_malusare) May 11, 2025
रुपनर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे. आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनुर् सैन्यात होते. त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिंमत रूपनूर पूंछ मध्ये तैनात आहेत. तर चुलते गोरख रूपनूर सध्या काश्मीर सीमेवर आहेत. तर प्रज्वल यांचे धाकटे बंधू प्रमिल रुपनूर बांगलादेश सीमेवर आहेत. घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. घरात सध्या फक्त महिला असून, आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदुर ही मोहीम यशस्वी करून यावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.