Chandrakant Patil : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशाल पाटील हे भाजपात प्रवेश करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
“राजकारणात नेहमी वर्तमानात चालावं लागतं. पुढे काय होईल ते माहिती नाही. वर्तमानात त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्षे 2 महिने आहेत. या कालावधीचा आम्ही विचार करतोय. ते बरोबर आले तर आमची केंद्रातील संख्याही वाढते. तसेच जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळते. त्यांना जे करायचं आहे ते सोपं जाईल. म्हणून आम्ही त्यांना जाहीरपणे ऑफर देत आहोत. त्याचा त्यांनी विचार करावा. राजकारणात वस्तुस्थितीवर आधारीत चालतं. वर्तमान काळावर चालतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“राजकारण गेले चुलीत, देशाचा जो अजेंडा आहे, त्याकडे सगळ्यांना जावंचं लागेल. त्यामुळे आमदार रोहित पवार प्रयागराजला डुबकी मारायला गेले. धर्म हा उपासनेशी जोडलेला नाही. धर्म हा संस्कृतीशी जोडला गेला आहे. त्यामुळे हिंदू धर्म जगामध्ये आयडीयल झाला, सर्व धर्मांना समान न्याय दिला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मशिदी बांधायला जागा दिल्या आणि अटल बिहारी वाजपेयी मदरशाला कॉम्प्युटर दिले. त्यामुळे हिंदू विचार देशातील अन्य विचारांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावे लागेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.Anil Deshmukh : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी रणनीती, अनिल देशमुख यांनी आतली बातमी फोडली
काँग्रेसचे निष्ठावंत विशाल पाटील भाजपात जाणार?
विशाल पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून मानले जातात. पण लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर सांगलीतील काँग्रेस गोटात खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सांगलीची जागा गेल्यामुळे विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी लढवली. या निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. तसेच निवडून येताच त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. पण याच विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यामुळे विशाल पाटील हे खरंच भाजप प्रवेश करतील का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.