Sangli News: रुग्णालयात दारू मिळाली नाही, संतापात रुग्णाचं धक्कादायक कृत्य, शासकीय रुग्णालयात खळबळ

सांगली: रुग्णालयात दारू न मिळाल्याने रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. मिरज शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील रुग्ण किरकोळ जखमी झाला आहे. मिरज शासकीय रुग्णालयाच्या इमारतीवरुन रुग्णाने कारवर उडी मारल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कारवर पडल्याने रुग्ण थोडक्यात बचावला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
एकावर अंत्यविधी सुरू होता, तेवढ्यातच अजून तिघे बुडाल्याची वार्ता, एकाच दिवशी चौघांचा बुडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये दारू न मिळाल्याने मिरज शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून रुग्णाने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महंमद गौस चंदुलाल रामपुरे असे त्या रुग्णाचे नाव आहे. महंमद रामपुरेला दारूचे व्यसन होते. त्याची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात त्याला नातेवाईकांनी दाखल केले होते. परंतु मिरज शासकीय रुग्णालयात दारू न मिळाल्याने महंमद रामपुरेने उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाकडे डिस्चार्ज मागितला. रुग्णाचे बिल भरण्यासाठी नातेवाईक रुग्णालयाच्या तळमजल्यावर गेले.

यावेळी पहिल्या मजल्यावर रुग्ण एकटाच असल्याने पुन्हा ऍडमिट करून घेण्याच्या गैरसमजुतीतून महंमद रामपुरे याने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु रामपुरेची उडी कारवर पडल्याने तो थोडक्यात बचावला. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. यामध्ये कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. रुग्ण मिरज शासकीय रुग्णालयातून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती.