Sangli: गुंगीचं औषध देत तरुणीवर अत्याचार, सांगलीत तीन कॅफेंची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

सांगली: सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तीन कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली. कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं आहे. याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.

कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे. या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून सांगलीमध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कॅफेनवरती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाई अद्याप तरी केल्याचं दिसून येत नाही. सांगली शहरामध्ये बेकायदेशीर कॅफे हे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. त्या ठिकाणी होणारे अश्लील चाळे अनेकदा निदर्शनास आले होते. परंतु, पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा दिसून येत आहे.

याबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने गंभीर आरोप देखील केले आहेत. आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेकडून शहरातील तीन कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड झाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होत संबंधित कॅफेवरती कारवाई करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सध्या पोलिस करत आहेत.