विधानसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मलिकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर त्यांची मुलगी सना मलिक अनुशक्तिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : विधानसभा निवणडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी आहे. राज्यातील सर्व दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत असून आता पुढील काही तासांमध्ये निकाल समोर येतील. मात्र अशातच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी जामीनावर बाहेर असलेल्या मलिकांविरोधात याचिका दाखल केली आहे. वानखेडे यांनी याचिका का दाखल केली जाणून घ्या.नवाब मलिक यांच्याविरोधात दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मलिकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं. समीर वानखेडे हे आता चेन्नई येथे ड्युटीवर असून ते उद्या म्हणजेच शनिवारी निकालाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. वानखेडेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मलिक आणि वानखेडेंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. मलिकांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून त्यांच्यावर आरोप केले होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मानखुर्द शिवाजी नगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि शिंदे गटाकडून सुरेश (बुलेट पाटील) रिंगणात उभे होते. २०१४ आणि २०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये अबू आझमी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. नवाब मलिक विजयाचा गुलाल उधळणार की अबू आझमी विजयाची हॅट्रिक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक त्यांच्या अनुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सना मलिक यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मलिकांची मुलगी आपल्या वडिलांचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा