महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सध्या राज्यात तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. आज आणि काल असे दोन दिवस अनेक आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यातच आता आणखी एक मोठा धक्का महाविकासआघाडीला बसला आहे. महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेता आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर जोरदार निशाणा साधला आहे.
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सपा आमदार अबू आझमी यांच्याबद्दल प्रशअन विचारण्यात आला. त्यावर त्यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या समाजवादी पार्टी ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचे नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.