S. Jaishankar :देशात वस्तूनिर्मितीला महत्त्व द्यावेच लागेल- परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे मत

मुंबई : ‘देशाला विकसनशील भारताकडून विकसित भारत या दर्जाकडे न्यायचे असेल तर ते स्वयंचलित पद्धतीने किंवा ऑटोपायलट मोडवर होणार नाही. आर्थिक प्रगतीचा वेग वाढवणे त्यासाठी गरजेचे आहे. म्हणूनच देशात वस्तूनिर्मितीला (मॅन्युफॅक्चरिंग) महत्त्व द्यावेच लागेल,’ अशी स्पष्टोक्ती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी केली. विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करताना ते राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसने वस्तूनिर्मितीला महत्त्व दिले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विविध उद्योगांमध्ये देशी तसेच परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने आर्थिक सुधारणा सातत्याने राबवल्या आहेत. आर्थिक धोरणे काळाशी सुसंगत अशी आखत ती राबवली आहेत, असे सांगून जयशंकर यांनी विरोधकांच्या आर्थिक धोरणावर अप्रत्यक्ष टीका करत पुन्हा १९९२पूर्वीचे आर्थिक धोरण देशात आणायचे आहे काय असा प्रतिप्रश्न केला.

Marigold Farming : तलासरीत बहरली झेंडूंची शेती, सध्या बाजारात शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय?

देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा करताना जयशंकर यांनी औद्योगिक वातावरणाविषयी भाष्य केले. ‘सरकार आणि भाजप मेक इन इंडियाच्या बाजूचे आहेत. आज देशातील फाइव्ह-जी तंत्रज्ञान पूर्ण भारतीय आहे. त्याचप्रमाणे विविध उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरची निर्मिती प्रत्यक्ष सुरू करण्यापर्यंत आपण प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाला प्रकल्पात रूपांतरित करणारे असे हे सरकार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

वस्तूनिर्मितीवर (मॅन्युफॅक्चरिंग) विश्वास नसलेल्या राहुल गांधी किंवा रघुराम राजन यांच्याप्रमाणे आम्ही नाही, असा टोलाही जयशंकर यांनी लगावला.

पाया तयार झाला

गेल्या १० वर्षांत आम्ही आर्थिक प्रगतीसाठी पाया तयार केला आहे. या पायावर आता पुढचे बेत आखता येणार आहेत. जगाला आज चांगल्या दर्जाच्या मालाबरोबरच प्रभावी अशी पुरवठा साखळी हवी आहे. जगभरातील कंपन्या सेमीकंडक्टरवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण यात मुसंडी मारत आहोत. खासगी गुंतवणुकीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसतो आहे. संरक्षण साहित्याचे आपण पूर्वी आयातदार होतो. आज मात्र भारतीय कंपन्या संरक्षण साहित्याची निर्मिती करून त्याची निर्यात करण्याप्रत गेल्या आहेत.

रुपयात व्यापार

विविध देशांशी भारतीय रुपयात व्यापार वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. आज अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष पैशाची चणचण आहे. तिथे डिजिटल रुपयाचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.