Rupali Chakankar : तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू, कोल्हेंच्या टीकेला चाकणकरांचं उत्तर

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. बैठकीमध्ये अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये निधी वाटपावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. तसेच अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड मधील मेळाव्यातून अजित पवार यांच्यावर गुलाबी जॅकेटवरून टीका केली होती यालाच यालाच रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ”घरच्या समोर रस्ता न बनवू शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळे गुलाबी स्वप्नावर शब्द न काढलेले बरे, तुमची लोकसभेची सूज आम्ही विधानसभेला उतरवू.”

जॅकेट भारी दिसतं म्हणून मी घालतो

गुलाबी जॅकेटवर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील मेळाव्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, ” मला लोक म्हणायला लागले दादा तुम्ही आता पिंक कपडे घालायला लागले. मी आज के पिंक जॅकेट घातलय का? मग ह्यांच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणता की दादा आज जॅकेट लयभारी दिसतय तुम्ही फोटो काढत असता हे पाहून मी पुन्हा तेच कपडे घालत असतो. मग त्यात नेमकं वाईट काय ?”. असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुढं पुढं करून मोठे होतात नंतर सोडून जातात

अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे विकास लांडे यांनी गव्हाणे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” अजित पवार यांनी माझ्यासह अनेक जणांना पद देऊन मोठं केलं आहे. परंतु आज त्यांच्या पुढं पुढाई करून लोक मोठी होतात आणि त्यांना सोडून जातात. याची मला मोठी खंत वाटते. दादा तुम्ही आता कडक शब्दांमध्ये समज द्या. ज्या लोकांना थांबायचे आहे त्यांनी थांबाव आणि ज्यांना सोडून जायचं त्यांनी जावं”. असं म्हणत गव्हाणे यांच्यावर टीका केली.