शहरात रिक्षाने प्रवास करताना बऱ्याच वेळा त्यांच्या उद्धटपणाचा अनुभव नागरिकांना येतो. अनेक जण भाडे नाकारतात. अशा वेळी त्यांच्या या वागण्याची तक्रार कुठे करायची, असा प्रश्न प्रवाशांसमोर होता. ‘आरटीओ’मध्ये जाऊन अथवा ई-मेलद्वारे तक्रार करता येणे शक्य होते; पण तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट होती. त्यामुळे महिन्याला एखादीच तक्रार यायची.
व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू
सण आणि सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हलचालक प्रवाशांची लुटमार करतात. त्यांच्या विरोधातदेखील तक्रारी करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे रिक्षा, कॅब आणि खासगी ट्रॅव्हलचालकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक अथवा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार गेल्या शुक्रवारी ‘आरटीओ’ने ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांसाठी खुला केला.
‘आरटीओ’च्या या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर गेल्या चार दिवसांमध्ये तीनशेपेक्षा जास्त संदेश आले आहेत. त्यात सर्वाधिक संदेश शुभेच्छा देणारे, इतर माहिती देणारे अथवा चौकशी करणारेच आहेत. त्यावर रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रार करणारे केवळ १० संदेश आहेत. त्यामुळे इतर संदेशांच्या गर्दीत या तक्रारी शोधणे म्हणजे ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना एक जिकिरीचे काम झाले आहे. सध्या आलेल्या तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी या क्रमांकावर विनाकारण संदेश पाठवू नये, असे आवाहन ‘आरटीओ’कडून करण्यात आले आहे.
तक्रार करताना योग्य काळजी घ्या
नागरिकांनी एखाद्या रिक्षाचालक अथवा ट्रॅव्हलचालकाची तक्रार करताना योग्य माहिती पाठविणे आवश्यक आहे. त्यात रिक्षा अथवा बसचा क्रमांक, प्रवासाचे ठिकाण व तक्रारीची माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवावी. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांना त्या तक्रारीवरून माहिती काढून कारवाई करणे शक्य होईल.
नागरिकांच्या सोयीसाठी ‘आरटीओ’कडून व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. यावर रिक्षा, कॅब आणि ट्रॅव्हलचालकांच्या विरोधात तक्रारी करू शकता. त्याची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी शुभेच्छा अथवा इतर संदेश पाठवू नये. त्यामुळे मूळ कामात अडचणी येतात.
– अर्चना गायकवाड, आरटीओ, पुणे
तक्रारींसाठी सुरू केलेला व्हॉट्स अॅप क्रमांक – ८२७५३३०१०१
चार दिवसांत क्रमांकावर आलेले एकूण संदेश – ३००
चार दिवसांत आलेल्या संदेशांपैकी योग्य तक्रारी – १०