‘ट्रम्प यांच्याबद्दल आदर पण…’ आठवलेंची मोठी मागणी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते जालन्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दल आम्हाला आदर, पण पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आला पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे, वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे, अशी भूमिका मी अनेक वेळा मांडली आहे.  डोनाल्ड ट्रम्प किंवा कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको आहे, दहशतवादी कारवाया थांबल्या आणि पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर भारत थेट पाकिस्तानबरोबर चर्चा करायला तयार आहे. युद्धाची आवश्यकता अजिबात नाही, आमची भूमिका आहे की पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला पाहिजे. युद्धविरामाची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली.  पाकिस्तानने आपली हार मान्य केली आहे, असं आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान आंतरजातीय विवाह मदत योजना बंद करणार नाही, आंतरजातीय विवाहासाठी अनुदान देण्याचं बंद केलेलं नाहीये, ही केंद्रीय योजना बंद होणार नाही, प्रत्येक वर्षी अडीच लाख इंटरकास्ट लग्न होतात, समाज जवळ येत आहे, असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांच्या खात्याचा गोरगरिबांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळवणं योग्य नाही. समाज कल्याण व्यतिरिक्त इतर अनेक मोठी खाती आहेत, त्या खात्याचा निधी या योजनेकडे वळवला पाहिजे, कर्नाटकमध्ये तसा कायदा देखील आहे, सामाजिक खात्याचा निधी कुठेही इतर ठिकाणी वळवता येत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)