Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली. आमचा विरोध भाजपाच्या ढोंगीपणाला आहे. वक्फ विधेयक आणि हिंदुत्त्वाचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. त्यांच्या याच भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नेतृत्त्वची भूमिका ठोस नसली तर त्या पक्षाचा इतिहास संपतो. राहुल गांधी यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांना सतत जिना यांची आठवण येते, असा टोलाही त्यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
म्हणून उबाठाला जिना यांची आठवण येते
कालचा दिवस (3 एप्रिल) खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी होता. ते म्हणतात की वक्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही संबंध नाही. आमचा वक्फ बिलाला विरोध नसून आमचा भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे, असं ते म्हणत आहेत. ते अतिशय गोंधळलेल्या स्थितीत आहेत. काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा, हे उबाठा नेतृत्तावा सुचत नाहीये. बाळासाहेब ठाकरे यांचा देशभक्त मुसलमानांना पाठिंबा होता. हीच भूमिका आमची आणि भाजपाची आहे. सारखं आणि सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधी यांच्यासोबत राहिल्यामुळे उबाठाला जिना यांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करायचं ते समजत नाही. निर्णय काय घ्यायचे हेही समजत नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केलीय.
मोदी यांच्या निर्णयामुळे मुठभर लोकांना चाप बसणार
काही मुठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जमीन होती. वक्फ सुधारणा विधेयकामुळे याला चाप बसणार आहे. काँग्रेसच्या काळात 123 जागा काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. मोदी यांच्या निर्णयामुळे मुठभर लोकांना चाप बसेल. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर शाळा होतील, कॉलेजेस, रुग्णालये होतील. महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल. त्यामुळेच मुस्लीम लोकांनीही या विधेयकाचे स्वागतच केले आहे, असेही शिंदे म्हणाले.
…तर पक्षाचा इतिहास संपुष्टात येतो
एखादं नेतृत्त्व गोंधळलेल्या अवस्थेत गेलं की त्या पक्षाचा इतिहास संपुष्टात येत असतो. त्यांची जी परिस्थिती झाली आहे, ती महाराष्ट्र पाहात आहे. आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे घेऊन जात आहेत. आम्ही वैचारिक भूमिकेशी तडजोड करणार नाही. त्यांनी 2019 साली खुर्चीच्या मोहापाई जो अपराध केला, त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल केला आहे, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली आहे.