मुंबईच्या दहिसरमध्ये एक काळीज चिरणारी घटना घडली आहे. इयत्ता दहावी पास झाल्याचा आनंद अजून संपलेला नसतानाच एका 16 वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही मुलगी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सूर्यास्ताचे फोटो घेत होती. रिल बनवण्यासाठी फोटो घेत असतानाच तिचा तोल गेला आणि अचानक ती इमारतीच्या खाली पडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जान्हवी सावला असं या मुलीचं नाव आहे. ती एका आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिकत होती. जान्हवी आईवडिलांना एकूलती एक होती. पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला आहे. तसेच अपघाती मृत्यू म्हणून केस नोंद केली आहे. जान्हवी घराच्या छतावर एकटीच होती. त्यामुळे तिचा तोल जाऊन मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी सांगितलं.
रिल्स बनवायच्या नादात…
जान्हवीचे आईवडील दहिसर पूर्वेला मिस्टिका नगरमधील परिचय नावाच्या इमारतीत सातव्या मजल्यावर राहत होते. ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजता घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यास्ताचे फोटो खेचण्यासाठी जान्हवी आठव्या मजल्यावरील छतावर गेली होती. तिला रिल्स बनवायचे होते. पण फोटो घेत असताना तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर आपटली.
वडिलांनी दिली परवानगी
जान्हवीचे वडील समीर सावला (वय 42) हे कापडाचा व्यवसाय करतात. जान्हवीने छतावर जाऊन फोटो काढण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे समीर यांनी तिला छतावर जाऊन फोटो काढण्याची परवानगी दिली होती. ही घटना घडली तेव्हा समीर हे ग्राऊंड फ्लोवरच्या एका बँचवर बसले होते. त्यांच्यासमोरच काही अंतरावर जान्हवी कोसळली. त्यामुळे तिला शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ मिस्टिका नगरमधील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.
घातपात नाही
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात येऊन तपास सुरू केला. जान्हवीच्या आईवडिलांचं साक्ष नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचं जान्हवीच्या आईवडिलांनी सांगितलं. जान्हवी छतावर एकटी होती आणि छतावरील भिंतीवर बसून सूर्यास्ताचे फोटो घेत असताना तिचा तोल गेल्याने ती खाली पडल्याचं तिच्या आईवडिलांनी पोलिसांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळे सावली कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.