‘खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’ भाजप नगरसेवकांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य, महायुतीमध्ये मिठाचा खडा?

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. पुण्यात देखील पाच माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. विशाल धनवडे, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश होत असताना एकीकडे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या  शिवसेनेकडून सुद्धा या पाचही नगरसेवकांच्या जागेवर महापालिका निवडणुकीसाठी दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवेशाने पुणे शहरातले राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेलं असताना, या नगरसेवकांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असल्याचं वक्तव या पाचही नगरसेवकांनी एका सुरात व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे  भाजप पक्ष कार्यालयातच या नगरसेवकांकडून हा दावा करण्यात आला आहे.  त्यामुळे आता महायुतीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे,  आज या पाच माजी नगरसेवकांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत या पाच माजी  शिवसैनिकांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची नसून, उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं वक्तव्य केलं आहे. नगरसेवकांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 

दोन दिवसांपूर्वी या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, तेव्हा एका नगरसेवकाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला तर नऊ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आता यातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चारच नगरसेवक राहिले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)