उंदरासारख्या मनाची लोक पळून गेली
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की, ”तुम्ही आमच्यासह सर्वांवर असे खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण आमच्यासारखे लोक दबावाला बळी पडले नाहीत. तर काही उंदरासारख्या मनाची लोक पळून गेली. अजित पवार, एकनाथ शिंदे या लोकांना कारवाईची भीती होती म्हणून ते भाजपसोबत गेले. भाजपने हे फक्त भीती निर्माण करण्यासाठी केलं. आता माझ्या विरोधातील आणि नवाब मलिक यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्या”. असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
आता दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी
संजय राऊत पुढे म्हणाले की, ” आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायची बाकी आहे. हे सरकार भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेतात. त्यानंतर आमचं बळ किती वाढलंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. वायकर ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले. ज्या खटल्यामुळे ते पळून गेले त्यासंदर्भात आता क्लीन चीट देण्यात आली आहे.त्यांच्या मनात भीती निर्माण करून पक्षात बोलावलं गेलं हे तुम्ही मान्य केलंच पाहिजे”.
नेमकं काय आहे प्रकरण ?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित असलेला ५०० कोटी रुपयांचा भूखंड चोरल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला असून वायकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. गैरसमजामुळे मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत.